बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :गजानन राऊत
मेहकर, दि. ०६/०६/२०२५
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिलेल्या ठाम इशाऱ्यानंतर अखेर पालखी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्ते विकास महामंडळाने तात्काळ दखल घेत कामास सुरुवात केली असून, भेगा बुजवण्याचे व सुधारणा करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
शेगाव येथून दरवर्षी निघणारी संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतताना सिंदखेडराजा, किनगाव जट्टू, लोणार, सुलतानपूर, मेहकर, जानेफळ मार्गे जाते. मात्र या ६४ किलोमीटरच्या पालखी मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे वारकरी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.
या मार्गाचे मूळ काम रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत २०१७ साली श्रीहरी कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले होते. मात्र कंपनीने काम अर्धवट सोडले. नंतर दुसऱ्या ठेकेदाराकडे काम सोपवले गेले, पण त्यांनीही अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले. परिणामी रस्ता काहीच वर्षांत खराब झाला.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिनांक १५ मे रोजी मार्गाची पाहणी केली. रस्त्यावरील भेगा पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्ते विकास महामंडळाला २ जूनपर्यंत काम सुरू न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या इशाऱ्याची तात्काळ दखल घेण्यात आली आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
तरीही, ज्या कंत्राटदाराने हे काम निकृष्ट प्रकारे पूर्ण केले, त्याच्याविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की, दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई होऊन भविष्यातील अशा हलगर्जीपणाला आळा घातला जावा.



Post a Comment
0 Comments