मेहकर नगरपरिषदेत उबाठाची सरशी; किशोर गारोळे विजयी…
आ. सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात लढविलेल्या निवडणुकीत काँग्रेस-शिंदे गटाला मोठा धक्का
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस
मेहकर नगरपरिषदेत उबाठाची सरशी; किशोर गारोळे विजयी
आ. सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात लढविलेल्या निवडणुकीत काँग्रेस-शिंदे गटाला मोठा धक्का
बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ११ नगरपरिषदांपैकी मेहेकर नगरपरिषदेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने आपला झेंडा फडकावला आहे. उबाठाचे उमेदवार किशोर गारोळे यांनी निर्णायक विजय मिळवत नगराध्यक्षपदावर बाजी मारली आहे.
ही निवडणूक आमदार सिद्धार्थ खरात यांच्या सक्षम नेतृत्वाखाली लढविण्यात आली असून त्यांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे आणि संघटनात्मक ताकदीमुळे उबाठाला हे यश मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या निकालामुळे काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. दोन्ही पक्षांची अपेक्षा फोल ठरली असून मेहेकरमध्ये उबाठाने आपले बळ पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
विकास, स्वच्छता व पारदर्शकतेचा मुद्दा निर्णायक ठरला प्रचारादरम्यान शहराचा विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, पारदर्शक कारभार आणि जनतेशी थेट संवाद या मुद्द्यांवर किशोर गारोळे यांनी भर दिला होता. जनतेने त्यांच्या या भूमिकेवर विश्वास दाखवत मतपेटीतून कौल दिला.
विजयानंतर जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
विजयानंतर मेहेकर शहरात उबाठा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून जल्लोष केला. अनेक ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आले. “हा जनतेचा विश्वास आहे, आम्ही तो विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवू,” अशी प्रतिक्रिया किशोर गारोळे यांनी दिली.
आ. सिद्धार्थ खरात यांनीही “हा विजय मेहेकरच्या जनतेचा असून येत्या काळात शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यात येईल,” असे सांगितले.
या निकालामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात उबाठाची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे…


Post a Comment
0 Comments