Type Here to Get Search Results !

अंभोरे कुटुंबीयांचा आदर्श- वडिलांच्या रक्षा विसर्जनानिमित्त वृक्षारोपण व गायन प्रबोधन

 

मेहकर: गजानन राऊत



दिनांक:- ६ नोव्हेंबर २५

 मेहकर तालुक्यातील आंध्रुड येथील अंभोरे कुटुंबीयांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला.वडील कालकथित दौलतराव राजाराम अंभोरे यांचे वृद्धापकाळ व अल्पशा आजाराने वयाच्या ८९ व्या वर्षी २/११/२०२५,रविवारला सकाळी १०:२५ वा. निधन झाले. त्याच दिवशी आंध्रुड येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.स्मशानभूमीत एकही झाड नव्हते तेव्हा कुटुंबियांनी पर्यावरण पूरक दृष्टिकोण जोपासून १०झाडे लावण्याचा संकल्प सोडला.

      दिनांक ६/११/२०२५ला जलदान विधी तथा रक्षविसर्जनानिमित्त स्मशानभूमीत पिंपळ,वड, कॉर्पोशिया,गुलमोहर,करंज,कडुनिंब अशी झाडे लावली व रक्षा पाण्यात न टाकता झाडांना टाकली. यामुळे जलप्रदूषण टळून पर्यावरणाला हातभार लागला व वृक्षांच्या रूपाने वडिलांच्या स्मृती चिरंतन टिकून राहल्या.

      महाराष्ट्रातील विविध भागातून कालकथित दौलतराव राजाराम अंभोरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आली होती. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले व एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला अशा भावना व्यक्त केल्या. रात्री शाहीर संघपाल गवई यांचा भिमगीतांसह प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

        दौलतराव अंभोरे हे आयुष्यभर व्यसनांपासून कोसो दूर राहले.त्यांना हार्मोनियम वादन व गायनाची प्रचंड आवड होती. पंचशील गायन संचामध्ये ते प्रमुख कलावंत होते. मोलमजुरी करून प्रसंगी पदरमोड करून आपली पत्नी गयाबाई व मुलगा शाहिर भिमराव यांच्यासमवेत त्यांनी गावोगावी जाऊन बुद्ध भीम गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.

       चांदण्याची छाया कापराची काया, चला चला ग सोन लुटूया जाऊ आज पहाटी,नाग नदीच्या काठी, शेजारीण सखे बाई, असं कसं राज्य पहा आलं,गरिबां झाले तुझे हाल,सोन्याचं पानदान हळदी कुंकान घासिन,भीमनामाचा प्रसाद उभ्या गल्लीत वाटीन, भिरभिरत्या पाखरांनो संधी नामी आली, घरट्यात परतुनीया येण्याची वेळ झाली अशी विविध गाणी त्यांना प्रिय होती.त्यातही वामनदादांची गाणी  विशेष प्रिय होती.

आपला हाच वसा त्यांनी त्यांच्या मुलांवर सोपवला व त्यांची मुलेही स्वरसम्राट जनजागृती कलामंच,आंध्रुड या प्रबोधनात्मक संगीत ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन चालवत आहेत.

पर्यावरणपूरक व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.पंचशील नवयुवक मंडळ आंध्रुड यांनी मोलाचे सहकार्य केले.कालकथित दौलतराव राजाराम अंभोरे यांच्या पावन स्मृतीस  विनम्र अभिवादन.



 दौलतराव बाबा व गयाआईंना ६ मुले व १ मुलगी. पैकी मुलगी अंगणवाडी सुपरवायझर पदावरून नुकत्याच सेवानिवृत्त झाली तर ५ मुले शिक्षक व एक मुलगा शाहिर आहे. 

     आली जरी गरिबी सोडू नका शिक्षण, मोळी विका पण शाळा शिका, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्त्व या दांपत्याने वेळीच ओळखून आपल्या सर्व मुलांना हालअपेष्टा सोसून, कधी उपाशी तर कधी अर्धपोटी  राहून शिकविले व सुसंस्कारित करून समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला.

Post a Comment

0 Comments