Type Here to Get Search Results !

#नपा निवडणुकीच्या चक्रव्यूहात केल्या जाणार ‘खरातांची’ कोंडी? “विजयात आमचा 'हात' अन 'हाताच्याच' विरोधात प्रचार काँग्रेसची खंत



मेहकर:गजानन राऊत


महाभारतातील चक्रव्यूहाची कथा सर्वश्रुत आहे. गर्भार असलेल्या सुभद्रेला श्रीकृष्ण चक्रव्यूहात शिरण्याची युक्ती समजावत होते. तेव्हा तिच्या गर्भातील अभिमन्यूने ते बारकाईने ऐकले. पण बाहेर पडण्याची पद्धत ऐकण्याआधीच तो झोपला. त्याचा परिणाम — अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आत शिरला, पण बाहेर पडण्याचा मार्ग माहीत नसल्याने धारातीर्थी पडला.



राजकारणाच्या रणांगणातही आज अशीच परिस्थिती मेहकरमध्ये पाहायला मिळते आहे. मंत्रालयीन सचिवपदाचा अनुभव असलेल्या सिद्धार्थ खरातांनी विधानसभेच्या चक्रव्यूहाला धाडसीपणे भेदून दमदार विजय मिळवला. राज्यात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मेहकरच्या ' आरक्षित' जागेवर सलग विजयांची हॅट्रिक करणारे संजय रायमूलकर ‘चौकार’ मारतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. इतकेच नव्हे तर निकालापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी रायमूलकरांचे अभिनंदनही करून टाकले होते. मात्र सर्व अंदाज धुळीस मिळवत खरातांनी रायमूलकरांचा पराभव करून भावी कॅबिनेट मंत्र्यांची प्रतिमा असलेल्या नेत्यांला ‘माजी आमदार’ केले.


परंतु आता या विजयाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडून स्वतंत्र अस्तित्व उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्या खरातांसमोर महाविकास आघाडीचा नवाच चक्रव्यूह उभा राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातून बाहेर पडणे खरातांसाठी किती अवघड ठरणार? आगामी नपा निवडणुकीत याचे उत्तर मिळणार आहे.

मेहकर नगरपरिषदेवर अपवाद वगळता काँग्रेसचा तिरंगाच सतत फडकत राहला आहे. मेहकर विधानसभेची जागा महाविकास आघाडी मध्ये उबाठा च्या वाट्याला आली आणि सिद्धार्थ खरातांच्या रूपाने मेहकरचे आमदारपद उबाठा ला मिळाले.

महाविकास आघाडी म्हणून मोठा भाऊ असलेल्या भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( श प ) यांनी संघटितपणे काम करत 'प्रतापगड' भेदून मविआ चा झेंडा फडकवला.

मागील ९-१० वर्षांपासून प्रतिक्षित असलेली नपा ची निवडणूक आता होऊ घातली आहे.

नपा निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उबाठा चे युवा नेतृत्व 'कोरी पाटी' असलेले किशोर गारोळे प्रमुख दावेदार आहेत.किशोर गारोळे ह्या युवानेतृत्वाने तरुणांची फळी आपल्या मागे उभी करून शहरात स्वतःची आपली छबी भावी नगराध्यक्ष म्हणून नियोजनपूर्वक उभी केली आहे.

 आ खरातांच्या विजयात इतरांसोबतच किशोर गारोळे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मेहकर नगराध्यक्षपदासाठी मविआ ने उबाठा ला जागा सोडावी त्या बदल्यात लोणार व जिल्ह्यात इतर ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी ने अध्यक्षपद घ्यावे यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.

याउलट लोकसभा तुमची,विधानसभा तुमची अन आता नगरपालिका देखील तुम्हाला द्यायची आहे का..? आम्ही ताकदीने तुमच्या पाठीशी होतो,त्यामुळे तुमच्या विजयात आमचा ' हात ' आहे अन आता ज्यांनी तुम्हाला निवडून आणले, त्यांच्याच विरोधात तुम्ही प्रचार करणार का..? असा काँग्रेसचा संतप्त सवाल आमदार खरातांना आहे.

ज्यांनी तुमच्यासाठी लोकांना मते मागितली,त्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात तुम्ही मते मागणार का ? हा सवाल खरातांना विचारल्या जात असल्याने ह्या चक्रव्युव्हात आमदार सिद्धार्थ खरात यांना काँग्रेसने चांगलेच अडकून ठेवले आहे.

 स्वतःची फळी आणि उबाठा ला मेहकरात स्टॅण्ड करण्याची नपा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार खरात यांना सुवर्ण संधी आली आहे.

अंगाला तेल लावून तयार असलेला पहेलवान देखील त्यांच्या जवळ आहे,ही सारी जमेची बाजू असतांना ज्यांचा अधिकार आहे ती काँग्रेस खरातांच्या 'हाताला' लागत नसल्याने त्यांचा रोष पत्करून खरातांना आपला पहेलवान मैदानात उतरावा लागणार आहे.

काँग्रेसचे तर दोन दोन पहेलवान तेल लावून तयार आहेत.त्यातील एका पहेलवानाने तर खरात यांच्या विरुद्ध थेटच दंड थोपटले आहेत.

माजी नगराध्यक्ष आणि अध्यक्षपदाचे भरभक्कमपणे दावेदार असलेले कासम गवळी वेगवेगळ्या बैठकीत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत असल्याने येणाऱ्या काळात ह्या निवडणुकीच्या परिणामाला आमदार खरात कसे सामोरे जातात की ह्या चक्रव्युव्हात अडकून राजकीय परिणामाला सामोरे जातात आणि पडद्यासमोरील आणि पडद्या मागील लढाईचा चक्रव्युव्ह ते कसा भेदतात की कोंडी होते हे बघणे औत्सुकतेचे ठरणार आहे.


राजकीय खेळीत खरातांचा नवखेपणा

विधानसभेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अन उच्चपदस्थ अधिकारी राहलेल्या खरातांना ह्या निवडणुकीत आपल्या पहिल्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.मेहकरच्या राजकारणाची अजूनही पुरेशी ओळख नसलेल्या सिद्धार्थ खरात यांना अनेक राजकीय डावपेचांना सामोरे जावे लागणार आहे. मशाल पेटवायला कुणाची आगडबी असणार आणि कोण त्यांच्यावर बाण सोडणार ..? 

काँग्रेस आणि उबाठा मधील तणाव वाढविण्यासाठी कुठली अदृश्य शक्ती कुणाच्या खांद्यावर बाण ठेवून निशाणा साधणार...? हे समजणे सद्या तरी खरातांना अवघड जाणार आहे. त्यामुळे हा चक्रव्युव्ह आमदार खरात भेदणार का..? की त्याचे दूरगामी परिणाम भोगणार हे येणारा काळच सांगेल.

Post a Comment

0 Comments