निर्दयीपणे जनावरांची वाहतूक; जानेफळ पोलिसांकडून तत्काळ कारवाई सुरू
देऊळगाव साकर्शा येथे २७ म्हशी जखमी अवस्थेत ट्रकमधून मुक्त
(मेहकर – प्रतिनिधी गजानन राऊत)
दि. २ डिसेंबर
मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत १ डिसेंबर रोजी जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आली. नायगाव दत्तापूरहून जाणाऱ्या बारा टायर ट्रक (क्र. MP 51 ZA 8816) मध्ये २७ म्हशी बेकायदेशीर व अमानुष पद्धतीने कोंबून बांधलेल्या अवस्थेत आढळल्या.
स्थानिक वाहतूकदारांना ट्रकमधून येणाऱ्या जनावरांच्या हंबरड्याचा संशय आल्याने त्यांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. चालकाने काही वाहने उडवण्याचा प्रयत्न करत पळ काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर देऊळगाव साकर्शा येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते व पोलीस मित्रांच्या मदतीने ट्रक अडवण्यात यश आले.
जानेफळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहन ताब्यात घेतले. पंचनामा करून सर्व म्हशी शेलगाव देशमुख येथील गो-रक्षण केंद्रात जमा करण्यात आल्या.
ठाणेदार मोरे यांनी सांगितले की,
“म्हशी कुठून आणल्या, कुठे जात होत्या, चोरीच्या आहेत की नाही याची सखोल चौकशी सुरू आहे. चोरीच्या असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांच्या मालकीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना म्हशी परत दिल्या जातील.”
दरम्यान, जानेफळ परिसरातील बबन अवचार यांच्या शेतातील चोरीला गेलेल्या बैलजोडीचा तपासही सुरू असून चोरीचे रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस पथक सतर्क आहे, असेही ठाणेदार मोरे यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments