मेहकरमध्ये दुहेरी हत्याकांड, पतीकडून पत्नी व चार वर्षांच्या मुलाची हत्या पत्नी वर केले कुराडीने वारमेहकरमध्ये दुहेरी हत्याकांड, पतीकडून पत्नी व चार वर्षांच्या मुलाची हत्या पत्नी वर केले कुराडीने वार
मेहकर:गजानन राऊत
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी, वार्ड नं१ येथे रविवारी (२९ डिसेंबर) रात्री एक धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नी व चार वर्षांच्या चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली असून, यामुळे संपूर्ण मेहकर शहर हादरून गेले आहे.
या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी पतीचे नाव राहुल हरी म्हस्के (वय ३५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असताना आरोपीने पत्नी व मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना जालना परिसरात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
राहुल म्हस्के यांच्यासह त्यांचे आई-वडील व आजी असे एकूण सहा जण शिक्षक कॉलनीतील घरात वास्तव्यास होते. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
मेहकर पोलिसांनी आरोपी राहुल म्हस्के याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण, संशयाची पार्श्वभूमी आणि आरोपीची मानसिक स्थिती याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चार वर्षांच्या निष्पाप रियांशच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, घरगुती संशय आणि मानसिक अस्थैर्याचे भीषण परिणाम या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहेत.



Post a Comment
0 Comments