आरोग्यास अपायकारक सुगंधित पान मसाला व गुटखा विकणारा इसम जेरबंद
बुलढाणा:गजानन राऊत
स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाची धडाकेबाज कारवाई
बुलढाणा, दि. 05 डिसेंबर 2025 स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तसेच आरोग्यास अपायकारक सुगंधित पान मसाला व गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
पथक बुलढाणा उपविभागातील पेट्रोलिंगदरम्यान कार्यरत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेख तैसीफ शेख बुढण (वय 34), रा. इस्लामपुरा, अमडापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा हा आपल्या ताब्यातील निवासस्थानी गुटखा व पान मसाल्याचा साठा बेकायदेशीररीत्या विक्रीस ठेवत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथकाने आरोपीच्या घराची कायदेशीर झडती घेतली असता वेगवेगळ्या कंपन्यांचा सुगंधित पान मसाला व गुटखा असा एकूण सुमारे रु. 95,392/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेऊन अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 395/2025 नोंद करण्यात आला आहे. आरोपीवर कलम 223, 274, 275, 123 बीएनएस, तसेच इतर सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26(2)(IV) व कलम 51(I) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली, तर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
कारवाईत पोउपनि अविनाश जायभाये, पोना सुनील मिसाळ, अनंत फरताळे आणि गणेश वाघ (स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा) यांनी विशेष सहभाग नोंदविला.

Post a Comment
0 Comments