अखेर सारशिव येथील उपोषणाची आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते सांगता
मेहकर प्रतिनिधी : गजानन राऊत
सारशिव येथील सार्वजनिक पिण्याच्या विहिरीतून बेकायदेशीर सिंचन उपसा, जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण, स्मशानभूमीतील अतिक्रमण तसेच स्मशानभूमीत लावलेल्या झटका मशीनच्या विरोधात पंकज उद्धव वाघ व मनीष जाधव यांनी १९ जानेवारीपासून पंचायत समिती मेहकर कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
या उपोषणाची दखल घेताच मेहकर–लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्त्यांच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेत आमदार खरात यांनी आठ दिवसांच्या आत सर्व मागण्या मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश गटविकास अधिकारी श्री. खरात व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, दत्ता मोतेकर, नगरसेवक अमर घोडे, पत्रकार रविंद्र वाघ, शाहीर देवानंद वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने व समाधान झाल्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते चहा व पाणी देऊन उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. तसेच या प्रकरणातील सर्व कार्यवाही नियमानुसार राबवून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार खरात यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment
0 Comments