जानेफळ येथे शिवमहापुराण कथेची भक्तिभावात सांगता अंजलीताई केंद्रे यांच्या अमृतवाणीने भक्त झाले मंत्रमुग्ध
बुलढाणा:गजानन राऊत
मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे गेल्या पाच वर्षांपासून परंपरेने आयोजित करण्यात येणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचे यंदाचे आयोजन गणपती मंदिरासमोर दि. १ ते ८ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्ताने गावासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
शिवमहापुराण कथेच्या सहाव्या पुष्पगुंफणप्रसंगी दि. ६ जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थीच्या पवित्र दिवशी विद्येची देवता श्रीगणेशाचा प्रतीकात्मक विवाह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला मंडळींनी पारंपरिक फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात व भक्तिगीतांच्या निनादात संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता.
अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात दि. १ जानेवारी रोजी झाली असून दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ११ ते दुपारी ४ शिवमहापुराण कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० हरिकीर्तन असे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. दि. ८ जानेवारी रोजी गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवमहापुराण कथेचे प्रवचन ह.भ.प. अंजली अर्जुनराव केंद्रे यांच्या ओघवत्या अमृतवाणीतून होत असून त्यांच्या प्रभावी शैलीमुळे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. कथानकानुसार प्रत्येक पुष्पगुंफणप्रसंगी विविध देव-देवतांच्या झाक्यांचे सादरीकरण करण्यात येत आहे. विद्यार्थी व भाविक भक्तांनी साकारलेले ईश्वरी अवतार उपस्थित श्रोत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
किर्तन सेवेत चोपदार म्हणून संतोष मंजुळकर व शिवशंकर कृपाळ, मृदंगाचार्य म्हणून जगन्नाथ बोडखे तर गायन सेवेत मंगेश महाराज, स्वप्निल महाराज, धनोकार महाराज व मदन महाराज चांदणे सहभागी झाले आहेत. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी गावातील दानशूर नागरिकांनी अन्नदान व द्रव्यदान करून सहकार्य केले आहे.
हा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी बबन अवचार, दत्तात्रय अवचार, ज्ञानेश्वर इंगळे, शंकर अवचार, प्रदीप खोलगडे, गजानन कावळे यांच्यासह समस्त आयोजन मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments