अंतीम आठवडा प्रस्तावावर भाषणादरम्यान आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले
विदर्भासाठी नेमकं काय दिलं ते सांगा”-आमदार खरात यांचा सवाल
मेहकर दि १४
महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीबाबत व क्रमांकाबद्दल मुख्यमंत्री महोदय मोठमोठी आकडेवारी सादर करत असतांना बुलडाणा, मेहकर व विदर्भाला काय या मुळ मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच आमदार सिद्धार्थ खरात विधानभवनात संतप्त झाले. मुख्यमंत्री उद्योग, गुंतवणूक आणि भविष्यातील योजनांची माहिती देत असतानाच आमदार खरात यांनी त्यांना थेट रोखत विदर्भासाठी आणि विशेषतः बुलढाणा जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात काय मिळाले, याचा जाब विचारला. दोन मिनिटे सभागृहात गोंधळ निर्माण झाला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही पहिल्यांदा आमदार झाल्यामुळे सभागृहाची शिस्त व नियम पाळण्याबद्दल .तसेच मी विदर्भासाठी काय दिले याची मागील काळातली तुलना करायचे झाले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशा शब्दात त्यांनी आमदार खरात यांना सांगितले ..
याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार सिद्धार्थ खरात बोलले की
“मुख्यमंत्री महोदय, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगत आहात; पण विदर्भाला त्याचा किती फायदा झाला? माझ्या बुलढाणा जिल्ह्याला काय मिळालं? मेहकरसाठी नेमकं काय दिलं?” असे थेट प्रश्न उपस्थित करत आमदार खरात यांनी सभागृहाचे लक्ष मुळ मुद्द्यांकडे वेधले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती देण्याचे आश्वासन देत शांत राहण्याची विनंती केली, मात्र आमदार खरात यांनी आपला मुद्दा कायम ठेवला.
आमदार खरात म्हणाले की, “माननीय मुख्यमंत्री विदर्भाचे नेतृत्व करतात, ते राज्यात गुंतवणूक आणतात, याचा आम्हालाही अभिमान आहे. मात्र ७ ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ज्या घोषणा झाल्या, त्याव्यतिरिक्त या विदर्भ अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी, रोजगारासाठी किंवा औद्योगिक विकासासाठी कोणतीही नवी ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्याच जुन्या घोषणा पुन्हा सांगण्यात आल्या.”
भविष्यात होणारे विमानतळ, रस्ते, पायाभूत सुविधा याबाबतची आकडेवारी देण्यात आली, हे स्वागतार्ह असले तरी विदर्भातील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढणार आहे का, येथील तरुणांना रोजगार मिळणार आहे का, मागास जिल्ह्यांचा औद्योगिक विकास होणार आहे का, हे प्रश्न अनुत्तरितच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्न सुमारे तीन लाख रुपयांवर आहे, तर बुलढाणा जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न अवघ्या एक लाखाच्या आसपास आहे. हा प्रचंड फरक नेमका कसा भरून काढणार?” असा सवाल करत त्यांनी नंदुरबार, धुळे, बुलढाणा यांसारख्या मागास जिल्ह्यांना औद्योगिक विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची गरज अधोरेखित केली.
ग्रामीण भागातील पांदण रस्ते, शेतरस्ते, मूलभूत सुविधा याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करत, मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकेंद्रित घोषणा केल्या जात असल्याचा आरोपही आमदार खरात यांनी केला. “विदर्भात अधिवेशन घेऊन घोषण्या मात्र मुंबईसाठी करायच्या आणि विदर्भाच्या तोंडाला पाणी पुसायचं, असा प्रकार सुरू आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विदर्भासाठी ठोस निर्णय, शेतकरी आणि युवकांच्या भवितव्यासाठी स्पष्ट धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची गरज असल्याचे ठाम मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी या अधिवेशनात मांडले

Post a Comment
0 Comments