डोणगावात रेशन घोटाळ्याचा सडका वास!….
निकृष्ट तांदूळ, उग्र वासाची ज्वारी; सलग तिसऱ्या महिन्यातही गरीबांच्या ताटात निकृष्ट धान्य….
( डोणगाव ता. मेहकर)
मेहेकर तालुक्यातील डोणगाव परिसरात शासकीय रेशन व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र असून, लाभार्थ्यांच्या वाट्याला येणाऱ्या धान्याची अवस्था पाहता हे “योजना” नसून “यातना” ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
स्वस्त धान्य दुकानांतून दिला जाणारा तांदूळ तब्बल ६० टक्के तुटलेला, भुसभुशीत व दर्जाहीन असून ज्वारीला कुजका वास येत असल्याने ती थेट कचऱ्यात टाकण्याची वेळ लाभार्थ्यांवर येत आहे. अशा धान्याचे सेवन करणे आरोग्यास धोकादायक ठरू शकते, असे मतही नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे ही अवस्था आज-कालची नसून सलग तिसऱ्या महिन्यातही अशीच निकृष्ट धान्याची खेप येत आहे. वारंवार तक्रारी करूनही ना पुरवठा विभागाला जाग येतेय, ना दोषींवर कारवाई होतेय. त्यामुळे “घोटाळ्याला कोणाचे आशीर्वाद आहेत?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
धान्य परत देण्याचा प्रयत्न केला असता दुकानदार “वरून जसे आले तसे वाटप करतो” असे सांगून जबाबदारी झटकतात, तर अधिकारी डोळेझाक करत असल्याचा आरोप आहे. या साऱ्या साखळीत कोण तरी मोठा मासा सुरक्षितपणे पोहत आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
गोरगरीबांच्या ताटाशी थेट खेळ चालू असताना प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. तातडीने नमुने तपासणीसाठी पाठवावेत, दोषी ठेकेदार, दुकानदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि लाभार्थ्यांना योग्य दर्जाचे धान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी ठाम मागणी नागरिक करत आहेत.
अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही काही सामाजिक संघटनांनी दिला आहे.



Post a Comment
0 Comments