जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारावे
जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन
बुलढाण्यात महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन कार्यशाळा
(बुलढाणा :गजानन राऊत)
बुलढाणा, दि. २ : जिल्ह्यात फळपीक, अन्न व कृषी आधारित उद्योग उभारण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असून शेतकरी, युवक-युवती, महिला बचत गट, नवउद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या संधीचा लाभ घेत प्रक्रिया उद्योग उभारुन निर्यात वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
जिल्हा निर्यात प्रचालन समिती आणि उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन २०२६ अंतर्गत विशेष कार्यशाळा शुक्रवारी उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते झाले.
जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील पुढे म्हणाले की, राज्य शासनाने १ ट्रिलियन डॅालरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवून उद्योग व निर्यात वाढीसाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजना सुरु केल्या आहेत. जिल्ह्यात फळपीक प्रकिया, बिजोत्पादन, भाजीपाला, औषध निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याची मोठी संधी आहे. त्यासाठी भरीव अनुदानही दिले जाते. जिल्हा प्रशासनानेही पारंपरिक पिकांसह फळबाग लागवड, भाजीपाला, बिजोत्पादन, सफेद मुसळी उत्पादन, औषध निर्मिती, पर्यटन क्षेत्राला प्राधान्य दिले असून या क्षेत्रात नवीन उद्योग सुरु करण्यासाठी इच्छूकांना सहकार्य करण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. मैत्री पोर्टलच्या माध्यमातून नवीन उद्योगासाठी अर्ज व विविध परवानग्या दिल्या जात आहे. तसेच फळबाग व भाजीपाला लागवड, बिजोत्पादनासाठी रोजगार हमी योजनेचा लाभ देखील दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी, युवकयुवती, उद्योजक, निर्यातदारांनी संधी असलेल्या क्षेत्राला प्राधान्य देवून जिल्ह्यातील उत्पादनाची जास्तीत जास्त निर्यात करावी आणि जिल्ह्याचे नावलौकीक करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
#निर्यातीत_बुलढाणा_जिल्हा_अव्वल
औद्योगिक निर्यात क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्याची भरीव प्रगती झाली असून गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातून ८७४ कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली आहे. सलग तीन वर्षांपासून बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात निर्यातीत अव्वल ठरला आहे. चालू वर्षात ही निर्यात १५०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सर्व घटकांनी त्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
या कार्यशाळेत निर्यातदार सुमीत चौधरी आपले अनुभव विषद केले. तसेच स्टेट बॅंक ॲाफ इंडियाच्या फॅारेक्स शाखेच्या व्यवस्थापकांनी बॅंकेच्या प्रक्रिया, सुविधांविषयी माहिती दिली. यासोबतच मैत्री ॲक्ट, अर्ज व परवानग्यासाठी मैत्री पोर्टल, एक खिडकी योजना आणि तक्रार निवारण प्रणालीबाबत विजय शिंदे यांनी माहिती दिली. तसेच न्यू इंडिया अश्यूरंस कंपनीमार्फत बीमा साथी या योजनेविषयी माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेच्या प्रास्ताविकात महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी जिल्ह्याच्या निर्यात क्षेत्रातील कामगिरीविषयी माहिती दिली. तर व्यवस्थापक सुनील पाटील यांनी राज्य शासनाच्या नवीन औद्योगिक धोरणाची माहिती दिली.
या कार्यशाळेला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, उद्योग सहसंचालक रंजना पौळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, डिजीएफटीचे रितेश ठाकूर, निर्यातदार सुमीत चौधरी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक के के सिंग, व्यवस्थापक सुनील पाटील, सीए रितेश गुप्ता, अंकित गुप्ता, जिल्ह्यातील निर्यातदार, नवउद्योजक तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे आणि बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments