बुलढाणा जिल्ह्याचा
मेहकर तालुक्यात कासारखेड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात गाईचा मृत्यू
मेहकर तालुक्यात बिबट्याची दहशत
प्रतिनिधी गजानन
राऊत
मेहकर तालुक्यातील कासारखेड परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कासारखेड येथील शेतकरी विश्वास दादाराव सवडतकर हे बुधवार, दि. १जानेवारी २०२६ रोजी सकाळी शेतात गेले असता त्यांनी बांधलेली दोन जनावरे आढळून आली. त्यापैकी चार ते पाच वर्षे वयाच्या गाईला बिबट्याने हल्ला करून तिचा मृत्यू केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच सतीश मवाळ यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर घाटबोरी वन परिक्षेत्राअंतर्गत मांडवा वर्तुळाचे वनपाल व्ही. टी. मापारी व वडाळी बिटचे वनरक्षक एस. ए. पडघान हे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
यावेळी तलाठी देशमुख, कृषी सहायक वाघमारे, राजू सवडतकर, सतीश मवाळ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी कळमेश्वर व दुधा (रायपूर) परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. ती वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून त्यामुळे या भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या शेतांमध्ये ऊस, गहू व हरभरा यांसारखी पिके असून पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागत आहे. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने सतीश मवाळ यांनी केली आहे.
या घटनेमुळे कासारखेडसह परिसरातील शेतकरी सतर्क झाले असून वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
.jpeg)

Post a Comment
0 Comments