क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा ऐरणीवर
मेहकर पंचायत समितीकडून कडक नोटीस ठराव सादर करण्याचे आदेश
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस
डोणगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचा गंभीर व वारंवार निदर्शनास येणारा प्रकार क्रांतिकारी शेतकरी संघटनेने उघडकीस आणत त्याविरोधात पंचायत समिती मेहकर येथे तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे प्रशासनाला तात्काळ दखल घ्यावी लागून संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पंचायत समिती मेहकर यांच्या वतीने कडक नोटीस बजावण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत अधिकारी / ग्रामविकास अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव करणे बंधनकारक असताना डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी, व्हि.के. दांडगे मुख्यालयी राहत नसल्यामुळे गावातील विकासकामे, शासकीय योजना व नागरिकांचे मूलभूत प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे.
या अन्यायाविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती मेहकर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. ज्ञानेश्वर टाले म्हणाले,
“डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी जर मुख्यालयी राहत नसतील, तर ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय कोण देणार? शासनाचे स्पष्ट आदेश पायदळी तुडवले जात असतील तर क्रांतिकारी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. कागदोपत्री वास्तव दाखवून ग्रामस्थांची फसवणूक थांबली पाहिजे. अन्यथा अधिकारी बदली किंवा निलंबनाशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”
आंदोलनाची दखल घेत पंचायत समिती मेहकर प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मुख्यालयी वास्तव असल्याबाबतचा घरमालकाचा करारनामा किंवा घरभाडे पावती तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव दिनांक २७ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
निर्धारित मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचे गृहित धरून त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात येईल, असा कडक इशाराही पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
यापुढेही तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमध्ये अशाच प्रकारे अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटना आणखी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा डॉ. टाले यांनी यावेळी दिला.

Post a Comment
0 Comments